मिसिंग लिंकचा ७१२० कोटी रुपयांचा खर्च पाण्यात? जागतिक स्तरावर गौरविलेल्या प्रकल्पाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह !!

Foto

दरड कोसळल्याने मिसिंग लिंक बंद

मुंबई : जगातील सर्वात रुंद बोगदा, देशातील सर्वात उंच केबल-स्टेड पूल आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात आलेला, कोणत्याही नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यास सक्षम असल्याचा दावा करण्यात आलेला मिसिंग लिंक प्रकल्प १ मे रोजी मोठ्या गाजावाजात वाहतूक सेवेत दाखल करण्यात आला. मात्र, पहिल्याच पावसात राज्य सरकार आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) या सर्व दाव्यांची पोलखोल झाली आहे. मिसिंग लिंकच्या बोगद्याजवळ दरड कोसळल्याने बोगद्याच्या संरक्षक भिंतीचा भाग पुलावर कोसळला. यावेळी पुलावर कोणतेही वाहन नसल्याने जिवितहानी झाली नाही. मात्र, मिसिंग लिंक वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या घटनेमुळे प्रकल्पाच्या कामाच्या गुणवत्तेवर आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकल्पासाठी करण्यात आलेला ७१२० कोटी रुपयांचा खर्च पाण्यात गेल्याची टीका आता होत आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणि प्रवासाचा कालावधी आणखी कमी करण्यासाठी खोपोली ते कुसगाव असा १३.३ किमी लांबीचा मिसिंग लिंक एमएसआरडीसीकडून बांधण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी ७१२० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, हा खर्च भरून काढण्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पथकर वसुलीच्या कालावधीत १५ वर्षांची वाढ करून हा कालावधी २०३० वरून २०४५ पर्यंत वाढविण्यात आला आहे.

दरम्यान, दरीखोर्‍यात मिसिंग लिंकअंतर्गत केबल-स्टेड पूल बांधण्यात आला आहे. तर लोणावळा तलावाखालून मिसिंग लिंकमधील एक बोगदा जातो. त्यामुळे या प्रकल्पाचे काम अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि सर्व नैसर्गिक आपत्तींचा विचार करून करणे आवश्यक होते. त्यानुसार मिसिंग लिंकचे काम करण्यात आल्याचा दावा राज्य सरकार आणि एमएसआरडीसीकडून करण्यात आला होता. मात्र, मिसिंग लिंक वाहतूक सेवेत दाखल होऊन दोन महिनेही झाले नाहीत, तोच पावसामुळे मिसिंग लिंकच्या पुलावर खड्डे पडले आणि पुलाच्या कामाच्या दर्जावर तसेच प्रकल्पाच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाले. त्यानंतर सोमवारी मिसिंग लिंकवर दरड कोसळली आणि दुसर्‍या बोगद्याजवळील संरक्षक भिंत कोसळली. 

या घटनेमुळे राज्य सरकार आणि एमएसआरडीसीचे सर्व दावे साफ खोटे ठरल्याची टीका होत असून वाहनचालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या मिसिंग लिंक वाहतुकीसाठी बंद करण्यात आली असून, मिसिंग लिंकवरील मातीचा ढिगारा हटविण्याचे काम सुरू असल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली. तसेच, बोगदा किंवा पुलाचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचेही अधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरही पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई-पुण्यादरम्यानचा संपर्क तुटला आहे. मिसिंग लिंक आणि महामार्ग पूर्ववत करण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचेही अधिकार्‍यांनी सांगितले.